२५ पेक्षा जास्त वाहनधारक एकत्र आल्यास ‘एचएसआरपी’ मोफत बसवली जाणार – परिवहन विभागाचा निर्णय
- MimTimes मिम टाइम्स م ٹائمز
- Apr 10
- 1 min read

मुंबई, दि. १० एप्रिल: राज्यातील वाहनधारकांसाठी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. २५ किंवा त्यापेक्षा जास्त वाहनधारकांनी एकत्रितपणे ‘एचएसआरपी’ (उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी) बसविण्यासाठी बुकिंग केल्यास, ही पाटी कोणतेही अतिरिक्त फिटमेंट शुल्क न आकारता त्यांच्या निवासस्थानी, सोसायटी किंवा व्यवसायाच्या ठिकाणी बसवून दिली जाणार आहे. हे शिबिर निवासी कल्याण संघटना अथवा सोसायट्यांमार्फत आयोजित करता येईल.
राज्यात १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणीकृत वाहनांना ही ‘एचएसआरपी’ सक्तीने बसवावी लागणार आहे. या कार्यासाठी परिवहन विभागाने तीन अधिकृत उत्पादकांची नियुक्ती केली आहे. वाहनधारकांनी विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर https://transport.maharashtra.gov.in ऑनलाईन शुल्क भरून ‘एचएसआरपी’ची नोंदणी करावी.
जर एखाद्या वाहनधारकाने वैयक्तिकरित्या ‘होम फिटमेंट सर्व्हिस’चा पर्याय निवडला, तर त्यासाठी अतिरिक्त शुल्क भरावे लागेल. मात्र, एकाच ठिकाणी २५ पेक्षा जास्त वाहनांसाठी सामूहिक बुकिंग केल्यास हे अतिरिक्त शुल्क लागू होणार नाही.
एचएसआरपी शुल्क (जीएसटी वगळून):
दुचाकी आणि ट्रॅक्टरसाठी: ₹४५०
तीनचाकी वाहनांसाठी: ₹५००
हलकी वाहने, कार, मध्यम व जड वाहनांसाठी: ₹७४५
याशिवाय कोणतेही इतर शुल्क आकारण्यास मनाई आहे. काही ठिकाणी जुनी नंबर प्लेट काढण्याचे वेगळे शुल्क घेतल्याच्या तक्रारी विभागाला प्राप्त झाल्या असून, अशा तक्रारींसाठी नागरिकांनी ०२२-२०८२६४९८ या क्रमांकावर किंवा hsrpcomplaint.tco@gmail.com या ईमेलवर संपर्क साधावा, असे आवाहन सहपरिवहन आयुक्त शैलेश कामत यांनी केले आहे.
ही योजना वाहनधारकांसाठी एक मोठा दिलासा ठरणार असून, नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन परिवहन विभागाकडून करण्यात आले आहे.