top of page

९० दिवसांत पूर्ण होणार विधीमंडळातील आश्वासने संसदीय कार्य विभागाचे परिपत्रक विश्वासार्हतेकडे एक पाऊल – उपाध्यक्ष अण्णा बनसोडे

  • Writer: MimTimes मिम टाइम्स  م ٹائمز
    MimTimes मिम टाइम्स م ٹائمز
  • Oct 13, 2025
  • 1 min read

13 October 2025


मुंबई : विधीमंडळात दिलेली सर्व आश्वासने आता ९० दिवसांच्या आत पूर्ण करावी लागणार आहेत. संसदीय कार्य विभागाने जारी केलेल्या नव्या परिपत्रकामुळे शासनाच्या कामकाजात गती येणार असून, विधीमंडळाची विश्वासार्हता अधिक बळकट होणार आहे, असा विश्वास विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी व्यक्त केला.


उपाध्यक्ष बनसोडे म्हणाले की, “विधानसभेत आणि विधान परिषदेत मंत्र्यांकडून दिलेली आश्वासने अनेकदा हवेत विरतात. परंतु ही केवळ राजकीय घोषणा नसून, शासनाची वैधानिक जबाबदारी आहे.”


त्यांच्या मते, प्रत्येक विभागात सचिवांच्या अध्यक्षतेखाली आढावा समिती स्थापन केली जाणार आहे. ही समिती सभागृहात दिलेल्या प्रत्येक आश्वासनाच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणार आहे. आश्वासन समितीच्या बैठकीत अनेकदा फायली धूळ खात असल्याचे दिसून आले असल्याचे त्यांनी नमूद केले.


संसदीय कार्य विभागाने परिपत्रकाद्वारे स्पष्ट निर्देश दिले आहेत की, प्रत्येक विभागाने स्वतंत्र रजिस्टरमध्ये दिलेल्या सर्व आश्वासनांची नोंद ठेवावी. ही नोंद दर महिन्याच्या १ व १५ तारखेला अद्ययावत करणे बंधनकारक असेल. तसेच संसदीय कार्य विभाग आणि विधानमंडळ सचिवालयातील नोंदींची पडताळणी करून एकसारखेपणा राखण्याचाही आदेश देण्यात आला आहे.


बनसोडे म्हणाले, “शासनाच्या प्रत्येक विभागाने ही अंमलबजावणी काटेकोरपणे केल्यास विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांतील कामकाज ‘झिरो पेंडेन्सी’ साध्य करण्यात नक्कीच मदत होईल.”




bottom of page